माझ्या विषयी
वैयक्तिक परिचय
नमस्कार! मी सौ. वसुंधरा गजानन धोटे. मी एक विज्ञान पदवीधर शिक्षिका असून माझे शिक्षण एम.एस्सी. आणि एम.एड. झालेले आहे. सध्या मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, गावसूत (तालुका उमरेड, जिल्हा नागपूर) येथे कार्यरत आहे. ज्ञानदानाचे हे पवित्र कार्य मी अत्यंत आवडीने आणि निष्ठेने करत असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षणातून सकारात्मक बदल घडवून आणणे हेच मी माझे परमकर्तव्य मानते.
माझा दृष्टिकोन आणि ध्येय
“एकदा तुम्ही आशेची निवड केली की, काहीही शक्य होते…” या विचारावर माझा ठाम विश्वास आहे. शिक्षकी पेशा ही केवळ एक नोकरी नसून ती एक सक्षम आणि विचारशील पिढी घडवण्याची प्रक्रिया आहे. विज्ञानासारखा विषय हा केवळ पाठ्यपुस्तकांपुरता मर्यादित न ठेवता, तो मुलांच्या दैनंदिन जगण्याशी जोडला गेला पाहिजे. माझ्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करणे आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रवाहात आत्मविश्वासाने उभे करणे, हे माझे मुख्य ध्येय आहे.
माझ्या अध्यापनात मी ‘ज्ञानरचनावाद’ (Activity Based Learning – ABL) या पद्धतीचा जास्तीत जास्त वापर करते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या वेळेत आणि वेळेनंतरही मी विविध उपक्रम राबवते:
कृतीयुक्त विज्ञान: विज्ञानातील कठीण संकल्पना प्रयोगांतून सोप्या करणे आणि दरवर्षी ‘Gramo-Sci’ विज्ञान प्रदर्शनासारख्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे.
तंत्रज्ञानाची जोड: विद्यार्थ्यांना E-Waste बद्दल जागरूक करणे आणि आधुनिक तंत्रज्ञान, रोबोटिक्स, व ‘Krushimitra’ सारख्या वेबसाईट निर्मितीचे धडे देणे.
वाचन चळवळ: मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाढदिवसाला पुस्तके भेट देणे आणि ‘NIE’, ‘Kids Age’, ‘Twinkle Star’ यांसारखी मासिके उपलब्ध करून देणे.
आनंददायी शिक्षण: ‘दप्तरमुक्त आनंददायी शनिवार’, विविध मैदानी खेळ आणि ऑरोविक्स, मेधा योगा यांसारख्या ध्यानधारणेच्या सत्रांमधून विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक ताण दूर करणे.
Helping Hands: शाळेच्या वेळेनंतरही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला गती देण्यासाठी गावातील उच्च शिक्षित स्वयंसेवकांचे अमूल्य सहकार्य घेणे.
माझ्या या वेबसाईटचा (Learn with Vasu) उद्देश केवळ माझे कार्य दाखवणे हा नसून, माझे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि इतर शिक्षक मित्रांना उपयुक्त ठरेल असे शैक्षणिक साहित्य व विचार सर्वांसोबत शेअर करणे हा आहे. आपल्या सर्वांच्या साथीने आपण नक्कीच एक उज्वल भविष्य घडवू असा मला विश्वास आहे.
माझ्या या शैक्षणिक प्रवासात सामील झाल्याबद्दल धन्यवाद!
